Ram Shinde Elected as Legislative Council Chairperson : विधान परिषदेच्या सभापती पदी भाजपचे राम शिंदे यांची आज (१९ डिसेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सभागृहात केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी एकमताने निवड करण्यात आली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो, आपली उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी सर्वांनी शक्यतो एकमताने सभापतींती निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधा पक्षाने घेतला त्यासाठी विरोधी पक्षाचेदेखील आभार मानतो.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे. यापूर्वी देखील ना. स. फरांदे एक सर होते ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला. मला विश्वास आहे की आपणही तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं सभागृहाचा कार्यभार चालवाल यात मला शंका नाही”.
शिक्षक म्हणजे ज्ञानाची प्रज्वलीत ज्योत असं आपण मानतो. त्यामुळे शिक्षक जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो आणि शिकवतही असतो. म्हणून मला विश्वास आहे की या पदावर बसल्यावर या सभागृतून तुम्ही काही गोष्टी ग्रहण कराल आणि आपल्या मुखातून अनेक गोष्टी समाजाने घ्याव्यात अशा बाहेर पडतील, असेही फडणवीस म्हणाले. चांगले पायंडे तयार करणं ही पीठासीन अधिकाऱ्यांची महत्वाची जबाबदारी असते. ती तुम्ही पार पाडाल याबरोबरच विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यावर आम्हाला शिस्त लावाल असा विश्वास देखील आम्हाला आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते.