Devendra Fadnavis on Shivsena & NCP: गेल्या अडीच वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये उभी फूट पडली. त्यातून आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदार मोठ्या संख्येनं बाहेर पडले तर नंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी भाजपा-शिंदे गट युतीशी हातमिळवणी केली. मात्र, या दोन्ही गटांनी आजतागायत राजकीय वर्तुळात व प्रत्यक्ष कोर्टातही आपणच मूळ शिवसेना वा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची भूमिका ठाम ठेवली आहे. आता मात्र भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वात महत्त्वाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
इंडिया टुडेच्या मुंबई कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलाखतीदरम्यान अनेक प्रकारच्या राजकीय प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांना लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमकुवत पडला का? असा प्रश्न विचारला असता हा दावा त्यांनी फेटाळून लावला.
“भाजपाला कमकुवत म्हणणं हे चुकीचं विश्लेषण आहे. ज्यानं हे विश्लेषण केलं त्यांना पुन्हा नव्याने विश्लेषण करायला शिकवावं लागलं. भाजपानं ९ जागा जिंकल्या. १२ जागांवर भाजपा ३ टक्क्यांपेक्षा कमी फरकानं हरली आहे. पूर्ण विश्लेषणात आम्हीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. आम्हालाच सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे भाजपा सगळ्यात कमकुवत पक्ष आहे असं बोलणं चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मी एक स्पष्ट सांगेन की जो अपप्रचार केला जात होता, ज्या भरवश्यावर मविआनं जागा जिंकल्या, आज त्याबाबत लोकांना हे समजून चुकलंय की तो अपप्रचारच होता. मी आत्मविश्वासाने सांगेन की भाजपा व महायुती पूर्ण बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“स्ट्राईकरेटला काही महत्त्व नाही”
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा लढवल्या, त्या प्रमाणात जागा जिंकून आणण्यात अर्थात स्ट्राईकरेटमध्ये भाजपा मागे पडल्याबाबत विचारणा केली असता त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. “स्ट्राईकरेटला काही महत्त्व नाही. आकडे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही सांगू शकता. कुणी व्यक्ती एका बॉलमध्ये चार धावा काढून बाद झाला तर त्याचा स्ट्राईक रेट जास्तच राहणार आहे. स्ट्राईकरेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. दुसरा बिचारा १०० धावा करूनही स्ट्राईकरेटमध्ये ८०वरच राहू शकतो. महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष भाजपा होता, भाजपा आहे आणि भाजपाच राहील”, असं ते म्हणाले.
“…या बाबतीत नक्कीच आमची कामगिरी वाईट झाली”
“आमची लढाई जेव्हा आमच्याच आधीच्या रेकॉर्डशी झाली, ते पाहता ही आमची नक्कीच वाईट कामगिरी राहिली आहे. पण आमच्या जागा आम्ही ६ हजार, ४ हजार, १६ हजार अशा फरकानं हरलो आहोत. जिंकलेल्या जागांमध्ये एक जागा सोडली तर इतर जागा दीड-दोन लाखांच्या फरकानं जिंकलो आहोत”, असं ते म्हणाले.
शिंदे गट, अजित पवार गटाची साथ मिळाली नाही?
दरम्यान, शिंदे गट व अजित पवार गटाशी युती करूनही त्यांची मतांच्या रुपात साध लोकसभा निवडणुकीत मिळाली नाही का? अशी विचारणा केली असता फडणवीसांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
“एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली. पण एक बाब लक्षात ठेवावी लागेल. हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा मतदारवर्ग तयार करण्याची होती. त्यातून मतं आमच्याकडे हस्तांतरित करणं कठीण काम होतं. आमच्यासाठी ते कठीण काम नव्हतं. आम्ही स्थिर पक्ष होतो . त्यामुळे आमची मतं आम्ही त्यांच्याकडे वळवू शकलो. विधानसभेत मात्र हे होणार नाही. विधानसभेत ते नक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Supriya Sule : “अजित पवार आमचं आयुष्य विस्कळीत करून गेले”, सुप्रिया सुळेंचं विधान; म्हणाल्या…
“शिवसेनेशी आमची बरीच वर्षं युती आहे. त्यामुळे आमची मतं एकमेकांना देणं सोपं आहे. पण राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही अनेक वर्षं लढलो होतो. त्यामुळे त्यांची मतं वळवणं थोडं अवघड होतं. पण आता ते तेवढं कठीण राहणार नाही. कारण आता ही महायुती स्थिर झाली आहे”, असं ते म्हणाले.