Devendra Fadnavis On Nana Patole : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. सध्या सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आम्ही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांमधले नाहीत, असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावरही खोचक टीका केली. तसेच नाना पटोले यांच्यावरही भाष्य करत मिश्किल शब्दात टीका केली. ‘काँग्रेसने नाना पटोलेंचं नाव येथेही कापलं का? काँग्रेस नाना पटोलेंचा आवाज दाबत आहे का?’, अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातून राज्याची दिशा मांडली. राज्यपालांनी राज्याच्या विकासावर मार्गदर्शन केलं. पण राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेसचे नेते नाना पटोले सहभागी नव्हते. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेवेळी नानाभाऊ नेमकं कुठे होते? हे माहिती नाही. काँग्रेसने नाना पटोले यांचं नाव येथेही कापलं का? की नाना पटोले यांचा आवाज काँग्रेस येथेही दाबण्याचा प्रयत्न करत आहे? खरं तर नाना पटोले हे विदर्भाचा बुलंद आवाज आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नानाभाऊ रंगबेरंगी कपडे घालून येत होते. त्यामुळे मला वाटलं की नानाभाऊ दुसऱ्या माहोलमध्ये आहेत. पण आज ते पुन्हा पांढरे कपडे घालून आलेत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर मिश्किल टीका केली.

“महायुतीवर राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवला, त्यामुळे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यामुळे गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कामांची सुरुवात आपण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन झाले पाहिजेत. यासाठी मंत्री आशीष शेलार हे परदेशात प्रेजेंटेशन देखील करून आले आहेत. एक गोष्ट या ठिकाणी नक्कीच सांगितली पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमान असलेलं हे सरकार आहे. आम्ही कधीही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागतिले नाहीत. छत्रपतींचे वारस आहात याचा दाखला मागणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सर्वजण आहोत असं मानणारे आम्ही आहोत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

“महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आपण १०० दिवसांचं मिशन हातात घेतलं आहे. अगदी तालुक्याच्या पातळीवरील कार्यालय आहेत, त्यांना आपण सात प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. तेथील कार्यालयातील रेकॉर्ड, लोकांना भेटण्याच्या वेळा यासह वेगवेगळे सात कामे आपण त्यांना दिले आहेत. त्यांना आपण एक टार्गेट दिलं की काय-काय काम करायचं? तसेच १०० दिवसांच्या निकषावर किती काम केली याचा आढावा देखील आम्ही घेत आहोत. यातील अनेक विभागांनी खूप चांगले काम केलं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.