Devendra Fadnavis On OBC Leader Dropped From Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीली महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या या विस्तारात ३९ मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. ज्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर काही दिग्गजांना डावलण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नाही. यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्याला डवलण्यात आल्याचा आरोप केला आहे. ओबीसींचा वापर केला आणि सत्ता आल्यावर ओबीसी नेत्याला एखाद्या खड्यासारखं बाहेर काढलं, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. यावर आता भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी काँग्रेसला ओबीसींच्या मुद्द्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणीस म्हणाले की, “ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. काँग्रेसच्या उभ्या जीवनात ओबीसींवर अन्याय करण्याखेरीज काहीही केलं नाही. महाराष्ट्रातील ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं. महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी ४८ जीआर आमच्या सरकारने काढले. महाज्योतीची स्थापना, ५२ हॉस्टेल, शिक्षण, पीएचडी, विदेशी शिक्षण, रोजगार ही सगळी कामे महायुतीच्या सरकारने केली आहेत. काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही. देशातदेखील इतक्या वर्षानंतर ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा मोदींनी दिली. जवळपास ६०-६५ वर्षांनंतर मेडिकल प्रवेशात ओबीसींनी आरक्षण मोदींनी दिलं”

ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत फडणवीस म्हणाले की, “आजही मोदींच्या किंवा आमच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री पाहायला मिळतात. मला असं वाटतं काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि विजय वड्डेट्टीवार यांच्यावर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग त्यांनी आमच्यावर काढू नये, त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा”.

वडेट्टीवार काय म्हणाले होते?

छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “नक्कीच ओबीसीच्या नेतृत्वाला डावललं आहे. ओबीसींचा वापर केला आणि सत्ता आल्यानंतर ओबीसींना खड्यासारखं बाहेर काढल्याचं काम सरकारनं केल्याचं दिसतं. मोठ्या प्रमाणात ओबीसींची मतं आम्हाला मिळाल्याचं सरकार म्हणतं, नेते म्हणतात. मग सत्ता आल्यानंतर का डावलत आहात? म्हणजेच त्यांचा वापर करण्यात आला. ओबीसी असणं आणि ओबीसींचं नेतृत्व करणं यात फरक आहे. उद्या सरकार म्हणेल की आम्ही इतक्या ओबीसी चेहऱ्यांना संधी दिली त्याला काय अर्थ आहे? ओबीसींसाठी जो लढतोय त्याला डावलून तुम्ही ओबीसींचं खच्चीकरणच करत आहात. उद्या ओबीसींच्या हक्काचं कोणी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर नेतृत्वहीन करण्याचा हा प्रयत्न आहे असा माझा आरोप आहे”.

Story img Loader