Devendra Fadnavis : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन समितीकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आता राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने दोषारोपपत्र सादर केलं. यामध्ये वाल्मिक कराड हाच हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जातो. यावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत.
दुसरीकडे कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याप्रकरणी त्यांचाही राजीनामा घेतला जावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान, या घटनेच्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक पण थेट इशारा देणारं विधान केलं. ‘नैतिकतेचं अध:पतन झालं आहे असं वाटल्यास आम्ही थेट राजीनामा मागू’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून याआधीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. अनेकवेळा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा? असे अनेक मुद्दे उपस्थित होतात. त्याबाबत आमच्याकडेही भरपूर चर्चा झालेली आहे. त्या चर्चेच्या अंती मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली. कुठेही नैतिकतेचं अध:पतन झालेलं आहे असं जर आमच्या लक्षात आलं तर आम्ही कोणालाही वाचवणार नाहीत. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू”, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात क्लोअज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याबाबत आम्हाला सध्या कोणतीही भूमिका मांडता येत नाही, असंल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
शिंदेंचा टोला, अजित पवारांनी घेतली फिरकी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या बदलल्या आहेत, पण अजित पवारांची खुर्ची फिक्स असल्याचं मिश्कील वक्तव्य करत टोला लगावला. यावर लगेचच अजित पवार यांनीही उत्तर दिलं. “तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू”, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आमची रोटेटिंग चेअर आहे.