Devendra Fadnavis On Dhananjay Munde Resignation : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले. यातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाले. यावरून संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. मात्र, धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते अशी चर्चा आहे. पण त्यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढून टाकावं लागेल अशी धमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना दिल्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता या चर्चांवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. ते टिव्ही ९ मराठी वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी कालच राजीनामा दिला, राजीनामा घेण्यासाठी एवढा उशीर का झाला? तसेच यासाठी झालेल्या बैठकीत तुम्हाला त्यांना धमकी द्यावी लागली का? की तुम्ही राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढून टाकावं लागेल?, असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “पहिली गोष्ट अशी आहे की लोक प्रशासनातील प्रक्रिया समजून घेत नाहीत. जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना घडली, त्यानंतर सीआयडी स्थापन करण्याची मी घोषणा केली. तेव्हा सीआयडीच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, तुम्ही या प्रकरणात पूर्ण ताकदीने तपास करा. त्यानंतर या प्रकरणात सीआयडीने खूप चांगला तपास केला. फॉरेन्सिक टीमने या प्रकरणातील ज्या मोबाईलमधील डेटा डिलीट करण्यात आला होता. तो संपूर्ण डेटा नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने रिकव्हर केला. त्यानंतर या घटनेचे जे फोटो लोकांसमोर आले हे फोटो कोणीही शोधून काढलेले नाहीत, तर हे फोटो पोलिसांनी शोधून काढलेले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीने चांगलं काम केलेलं आहे. या प्रकरणात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. ज्या दिवशी दोषारोप पत्र दाखल झालं, तेव्हा मला माहिती पडलं की काय तपास झाला. मी गृहमंत्री आहे, पण त्याआधी एकदाही मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मला सांगून तपास करा असं म्हटलं नाही. तसेच ते समोर आलेले फोटोही दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर मी पाहिले. या प्रकरणात दुसरं कोणाची हस्तक्षेप करण्याची हिंमत देखील नाही आणि नव्हती”, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

उज्जवल निकमांची नियुक्ती उशीरा का?

“संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वकील उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलं होतं. त्यानंतर त्यांनी होकार दिला. आता उज्जवल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करताना उशीर का केला? याचं कारण म्हणजे नियमानुसार एखादा वकील त्या दोषारोप पत्रामध्ये अशीस्ट करू शकत नाही. त्यामुळे ज्या दिवशी दोषारोप पत्र दाखल होतं, त्यानंतर आपण फिर्यादी वकिलांना अपॉईंट करू शकतो. पण हे काही लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे काही लोक आरोप करत असतात”, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उशीर का?

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा लवकर झाला की उशीरा झाला? यात मी जाणार नाही. राजकारणात असल्यानंतर लोकांना टीका करायची असेल तर ते टीका करतात. यामध्ये आम्ही एक स्पष्ट भूमिका ठेवली. ज्या प्रकारचे फोटो समोर आले, ज्या प्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली, तसेच या हत्येच्या प्रकरणात ज्याला मुख्य सूत्रधार आरोपपत्रात म्हटलं आहे आणि तो व्यक्ती जर एखाद्या मंत्र्याच्या जवळचा असेल तर त्या मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. आता कधी-कधी अशा निर्णयाला थोडा वेळ लागतो. पण आम्ही याबाबत ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी देखील राजीनामा दिला”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

राजीनामा देण्यासाठी मुंडेंना धमकी दिली का?

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी तुम्हाला त्यांना खरंच धमकी द्यावी लागली का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी सविस्तर सांगितलं आहे. आता या पेक्षा जास्त बोलणं योग्य ठरणार नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Story img Loader