पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ दोन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेतेमंडळी अधिक आक्रमक होऊन, महायुती सरकारच्या कारभारावर टीका करण्यास सुरुवात झाली.
बेकायदेशीर पबवर कारवाई सुरु
यानंतर पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करावी. तसेच अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. त्यानंतर पुणे पोलिस, महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आल्याचे पाहण्यास मिळत असून आज सकाळपासून फर्ग्युसन रोडवरील अनाधिकृत हॉटेल, पब विरोधात बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे. या वरुन आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. ड्रग्ज प्रकरणात विरोधकांनी राजकारण करु नये असंही फडणवीस यांनी म्हटलंय.
हे पण वाचा- ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई
विरोधकांनी राजकारण करु नये
ड्रग्ज प्रकरणात विरोधकांनी काहीही केलं नाही. विरोधकांचं राज्यही होतं. त्यावेळी पोलीस विभागाचे कसे धिंडवडे निघाले आणि १०० कोटींचं टार्गेट कसं दिलं जात होतं हे सगळ्यांनी बघितलं आहे. आमचं धोरण हे देशभरात झीरो टॉलरन्सचं आहे. केंद्र सरकारची मदत मिळते आहे. त्यामुळे हे सगळं बाहेर येतं आहे. ड्रग्ज संदर्भातली जी परिस्थिती आहे, त्यावर राज्य सरकार योग्य कारवाई करतं आहे. पोलीसवाला असेल, हॉटेलवाला असेल त्यावर कारवाई होईल. दीर्घ काळ ही कारवाई करु नये. विरोधकांना याचं राजकारण करायचं असेल तर त्यांच्या अडीच वर्षांत काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या कार्यकाळात काय होत होतं हेदेखील मला सांगावं लागेल. माझ्यासाठी हा प्रश्न राजकारणापलिकडचा आहे. त्यामुळे यावर राजकारण न करता राज्य सरकारच्या भूमिकेचं स्वागत झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तर बँकांवर कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात दोन बैठका झाल्या. या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना आणि स्टेट बँकेच्या प्रतिनिधींना हे सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन कर्ज नाकारता. हे खपवून घेतलं जाणार नाही. जर बँका असं कारण देऊन कर्ज नाकारणार असतील तर आम्ही त्या बँकेविरोधात एफआयआर दाखल करु. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.