२०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. हा शपथविधी नेमका कसा घेतला? यामागे कुणाची खेळी होती? याबाबत लोकांच्या मनात अद्याप संभ्रम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा खुलासा फडणवीसांनी केला.
पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिस्टरी’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.”
हेही वाचा- “समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा, पण…”, आम आदमी पार्टीने स्पष्ट केली भूमिका
“यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली,” असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला. ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा- “…अन् एकनाथ शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली”, ‘त्या’ घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
फडणवीस पुढे म्हणाले, “आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती.”
हेही वाचा- मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “आता सरकार पडेल…”
मग शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी जे केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं.”