एकनाथ खडसे यांनी जाहीर सभेमध्ये भाजपावर, देवेंद्र फडणवासांवर आणि पक्षातील इतर नेत्यांवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याला आता बराच काळ उलटला आहे. एकीकडे राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत आली असताना विरोधी पक्षात असलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे. यावरून खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं असताना यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं झालं काय?
एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरून खडसेंच्या ‘भाजपावापसी’वर जोरदार चर्चा सुरू झाली.
“होय, मी भेट घेतली”
दरम्यान, या चर्चेवर खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त खरं असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.पण असं बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “अमित शाहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे. देवेंद्रजींनाही भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे. शहांना भेटू नये असा नियम आहे. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत,” असं खडसे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात दिलं उत्तर!
दरम्यान, खडसेंनी भाजपा सोडल्यापासून देवेंद्र फडणवीसांशी असलेलं त्यांचं वितुष्ट जगजाहीर असल्यामुळे खडसे पुन्हा भाजपामध्ये असल्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरते. आज प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात त्यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे पुन्हा भाजपामध्ये येणार असल्याची चर्चा असून त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यासंदर्भात काय सांगाल? अशी विचारणा करताच फडणवीसांनी फक्त “मला त्याबाबत कल्पना नाही”, एवढं म्हणून उत्तर आटोपतं घेतलं.
“देशात अस्वस्थता निर्माण करण्याचं षडयंत्र”
दरम्यान, पीएफआयवरील कारवाईबाबत विचारणा केली असता हा देशात अस्वस्थता निर्माण करण्याचा कट असल्याचं फडणवीस म्हणाले. “पीएफआयवर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणावर यासंदर्भातले वेगवेगळे पुरावे एनआयए, एटीएस, केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळ सरकारने पीएफआयवर बंदीची मागणी केली आहे. आता तपासातून अनेक गोष्टी बाहेर येतील. यांच्या मोडस ऑपरेंडीनुसार देशात अस्वस्थता तयारर करण्याचं षडयंत्र होतं. या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील”, असं ते म्हणाले.