Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीतील काही निर्णयाला स्थगिती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील ३,२०० कोटी रुपयांच्या कंटात्राला स्थगिती दिल्याचं बोललं जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपण कोणतीही स्थगिती दिली नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र, जिथे एखादी चूक होत आहे असं लक्षात आलं तर मी नक्कीच स्थगिती देईल, असं सूचक विधानही देवेंद्र फडणवीसांनी केलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“अलिकडच्या काळात मला रोज स्थगितीच्या बातम्या पाहायला मिळतात. मी स्थगिती दिल्याचं मला रोज ऐकायला मिळतं. त्यानंतर मला माझ्या कार्यालयाला विचारावं लागतं की आपण अशा काही कामांना स्थगिती दिली आहे का? मग ते म्हणतात आपल्याकडे अशी फाईलच आलेली नाही. अलिकडच्या काळात दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या की एक म्हणजे आमच्याकडे कोणत्याही आमदाराने निवेदन दिल्यानंतर त्यामध्ये त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी आम्ही तपासून कारवाई करतो असं लिहितो. आम्ही कधी दूर्लक्ष करत नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
तानाजी सावंतांच्या काळातील कामांना स्थगिती का?
आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “आरोग्य विभागाच्याबाबतीत केंद्र सरकारने जे काही पैसे आपल्याला दिले होते, त्यामध्ये आपण जे काही कामे सुचवली होती, त्या कामांमध्ये ९ टक्के पैसा खर्च केला होता. त्यावर केंद्र सरकारचं म्हणणं होतं की तो पैसा ५ टक्के केला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने हे आपल्याला कळवलं. त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी माहिती मागवली की कोणती कामे प्रायोरिटीने करायची. पण अशा पद्धतीची फाईल माझ्याकडे आलेली नाही आणि मी त्यावर कोणतीही स्थगिती दिलेली नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“…तर मी नक्कीच स्थगिती देईल”
“जिथे एखादी चूक होत आहे असं लक्षात आलं तर मी नक्कीच स्थगिती देईल. आवश्यकता पडली तर मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करेल. पण अशा चर्चा केल्या जातात की महायुतीत ओढातान सुरु आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या गोष्टी बंद केल्या जात आहेत. पण असं काहीही नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.