Devendra Fadnavis Praised Team India After Champions trophy 2025 Win : भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे भरभरून कौतुक केले जात आहे. यादरम्यान आज विधानसभा अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या ऐतिहासिक विजयाबद्दल विधानसभा सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले की, “सर्वांसाठी कालचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करत ही ट्रॉफी जिंकली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यानिमीत्ताने संघाचे कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं मनापासून अभिनंदन करूया. कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यात ज्या प्रकारे रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची शैली बदलून, मध्ये वेगाने मधेच संथ अशा प्रकारे पीचवर टिकून ७६ धावा काढल्या या ७६ धावाच सामन्याच्या निर्णायक धावा होत्या.”

“हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेट प्रेमींना एक अविस्मरणीय भेट आपल्या संघाने दिली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघात एक सांघिक भावना पाहायला मिळाले. चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला सातत्याने हुलकावणी देत होती त्यामुळे ही विशेष आनंदाची बाब आहे. मागच्या वेळचं शैल्य देखील आपल्या मनात होतं पण ते शैल्य काल पूर्ण करू शकलो. लागोपाठ दोन आयसीसी चॅम्पियनशीप जिंकणारा भारत एकमेव देश आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

रोहित-विराटच्या खेळीचे विशेष कौतुक

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मबाबत झालेल्या टीकेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरूवातीला अनेक टीकाकार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबाबत बोलत होते. त्यांच्या फॉर्मबद्दल चर्चा होत होती, पण फॉर्म हा टेंपररी असतो, क्लास परमनंट असतो हे या दोघांनी दाखवून दिलं. ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग रोहित शर्मा आणि त्या आधीच्या सामन्यात विराट कोहली यांच्याकडून पाहायला मिळाली, त्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं की ते अनुभवी आणि यंग असेच बॅट्समन ते आहेत.”

वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादवचाही उल्लेख

“वरूण चक्रवर्ती या खेळाडूचं मला विशेष कौतूक करावं वाटतं. आपल्या शालेय जीवनात ते क्रिकेट खेळले आहेत, पण त्यानंतर ते आर्किटेक झाले. थोडं क्रिकेटशी नातं तुटलं. काही दिवस नोकरी केली. पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होतं, पुन्हा क्रिकेटकडे वळले आणि आज त्यांच्या फिरकीपुढे सगळे नेस्तनाबूत झाले,” असे फडणवीस म्हणाले.

वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी अतिशय महत्त्वाच्या क्षणी त्यांनी महत्त्वाच्या विकेट काढत समोरच्या संघांना अडचणीत आणलं, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. चॅम्पयन्स ट्रॉफीवर तीन वेळा नाव कोरणारा भारत एकमेव देश झाला आहे असेही फडणवीसांनी सभागृहाला सांगितले.

चॅम्पियन टीमचं स्वागत आपण करू असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी सभागृहात मांडलेला संघाच्या अभिनंदनाचा ठराव एक प्रशस्ती पत्राच्या रुपाने संघाच्या प्रत्येक खेळाडूला पाठवला जावा अशी विनंती फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.