राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांची आज (२२ मे) ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आलं होतं. आयएल अँड एफएसकडून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सत्ताधारी भाजपाने जयंत पाटील यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला असल्याचा आरोप करत पाटील त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पाटील यांच्या सुरू असलेल्या चौकशीबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दरम्यान, विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपा केंत्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचं काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादं प्रकरण असेल म्हणून त्यांनी पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं असेल. जर पाटलांचा या खटल्याशी (आयएल अँड एफएस) काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही.
हे ही वाचा >> “महाविकास आघाडीत राष्ट्रवादी मोठा पक्ष, पण…”, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
प्रकरण काय?
आयएल अँड एफएसवर कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अँड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहिम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यात आता जयंत पाटलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती.