Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेणाऱ्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे. त्यांच्याकडून सहा महिन्यांच्या अनुदानाची प्रत्येकी नऊ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया यापुढेही चालू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केले जातील, महायुती सरकारने निवडणूक जिंकण्याचं उद्दीष्ट साध्य केलं असून आता ही योजना बंद केली जाईल असे दावे काही विरोधकांकडून केले जात होते. ते दावे मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले आणि ही योजना चालू राहील असं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस हे टीव्ही ९ वृत्तसमूहाच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की येत्या काळात सरकार लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केले जातील का? लाभार्थ्यांची संख्या कमी होणार का? यावर फडणवीस म्हणाले, “सध्या महाराष्ट्रातील २ कोटी ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये सरकारकडून भरले जात आहेत. आम्ही ही योजना लागू केली तेव्हा तिची पडताळणी करून पाहिलं नव्हतं. आम्ही योजना तयार केली आणि लगेच लागू केली. काही दिवसांत लाभार्थी महिलांना पैसे देण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही योजनेसाठी काही निकष लागू केले होते. जसे की लाभार्थी कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं, त्यांच्या घरात कार नसावी. लाभार्थी महिला करदात्या (आयकर) नसाव्यात. मात्र, काही महिलांनी हे निकष पायदळी तुडवून योजनेसाठी अर्ज केले व त्यांचे अर्ज पात्र देखील ठरले. त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि अजूनही घेत आहेत.”
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
फडणवीस म्हणाले, “आता आम्ही एकच गोष्ट करतोय की आमचे जे निकष आहेत, ज्या महिलांनी या निकषांची पूर्तता केली आहे आम्ही केवळ त्यांनाच या योजनेचा लाभ देत आहोत. कारण आगामी काळात आम्हाला कॅगला (CAG) देखील उत्तरं द्यायची आहेत. कॅग उद्या आम्हाला विचारेल की या अपात्र महिलांना तुम्ही पैसे कसे काय देताय? त्यावेळी आम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे आमची अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र, याद्वारे कोट्यवधी महिला अपात्र ठरणार नाहीत. अवघ्या काही बहिणी कमी होतील. परंतु, आम्हाला ते करावं लागणार आहे.”