Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील जाहीर झालं. यातच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन देखील पार पडलं. मात्र, सरकार स्थापन होऊन आज जवळपास १८ दिवस झाले आहेत. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत मोठं भाष्य केलं आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील सात ते आठ दिवसांत देण्यात येणार आहे.’ दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या हप्त्यात वाढ करून २१०० रुपये करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. मात्र, आता सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. यातच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये मिळणार? हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? आणि नेमकं किती मिळणार? याबाबत ‘लाडक्या बहिणी’मध्येही संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विविध विषयांची माहिती देताना लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करणार असे अश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रुपये कधीपासून मिळणार? याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.