राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाने मात्र या बंदवर चांगलीच टीका केली आहे. अनेक भाजपा नेत्यांनी या बंदचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत महाविकास आघाडा सरकारवर टीका केली आहे. आजचा हा बंद केवळ ढोंगीपणाचा कळस असल्याचंही ते म्हणाले आहेत.

यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. हीच ती मंडळी आहेत ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तिथलं सरकार दोषींवर कारवाई करत आहेत. मात्र राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने बंद करत आहे. प्रशासनची मदत घेऊन, वापर करून, दमदाटी करुन लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केले जात आहे. आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली आहे”.

या सरकारला एक नवं नाव देत देवेंद्र फडणवीस म्हणतात, “या सरकारचं नाव बंद सरकार असं आहे. आधी योजना बंद केल्या, त्यानंतर अनुदान बंद केलं. करोनाकाळात जेव्हा देश सुरू होता, तेव्हा राज्य बंद केलं आणि आता कुठे छोट्या व्यावसायिकांचं गाडं रुळावर येतंय तर आता पुन्हा सरकारने बंद पुकारला आहे. सरकार स्पॉन्सर दहशतवादाने हा बंद केला जात आहे. जर थोडी नैतिकता असेल तर बंद संपायच्या आधी राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पॅकेज जाहीर करतील”.