Devendra Fadnavis on Maharashtra govt bought historic sword of raghuji bhosale family : नागपूरच्या भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाइन विक्रीला काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान लंडनमधील या लिलावात राज्य सरकारने ही तलवार विकत घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणण्यात येणार असल्याबद्दल माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्म एक्सवर या तलवारीचे फोटो पोस्ट करत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

फडणवीस काय म्हणाले?

“नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला आनंद होतो. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे,” असे फडणवीस म्हणाले आहेत.

कोण होते रघुजी भोसले?

“रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता,” अशी माहितीही फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे.

किंमत किती?

“आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार आहे,” असेही फडणवीस म्हणाले आहेत.

ही तलवार नेमकी लंडन येथे कशी पोहचली याबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली आहे. “ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. १८१७ मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे,” अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली आहे.