Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला अपयश आलं. महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर रोजी) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षाला विरोधी पक्षनेतेपदसाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील मिळाल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? याबाबत आता चर्चा सुरु आहेत.
आता यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदाबाबत सरकारची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत सूचक विधान केलं. ‘विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो’, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे याबाबत काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“विरोधी पक्षनेतेपदाबाबत सरकारची भूमिका काहीच नसते. त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो. अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमची कोणतीही अडवणूक त्यात नसेल. आमचा कोणताही दबाव त्यात नसेल. विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभेच्या अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आम्ही त्याचा सन्मान करू”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
आमचं मंत्रीमंडळ सर्वसमावेशक : देवेंद्र फडणवीस
“आम्ही आमच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या समाजांना स्थान दिलं आहे. ४० टक्के नवे नेते या मंत्रिमंडळात आहेत. सर्व प्रकारचे चेहरे आहेत. जुने जाणते नेते देखील या मंत्रिमंडळात आहेत. आम्ही अनेक महिलांना देखील संधी दिली आहे. वेगवेगळ्या समाजांना संधी दिली आहे. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे. आमचं मंत्रिमंडळ सर्वसामावेशक असं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना म्हणाले.