Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. आता या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली असून राज्यातील जनतेचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. मात्र, आज मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलच्या अंदाज समोर आले आहेत. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवला आहे.

दरम्यान, एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आणि अपक्ष आणि इतर पक्षाच्या हाती सत्तेची सूत्र जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? कोणता पक्ष मोठा पक्ष ठरणार? हे सर्व आता निकालाच्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र, समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी अंदाजावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मतदानाचा टक्का जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा फायदा भाजपाला होतो’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : जनतेनं कोणत्या शिवसेनेला निवडलं? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पसंती कुणाला?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा-तेव्हा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो. यावेळी देखील आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मतदानाची आकडेवारी चांगल्या प्रकारे वाढली आहे. त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला त्याचा नक्कीच फायदा होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपा ठरणार मोठा पक्ष?

राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चाणक्य, मॅट्रीक्स, पोल डायरी, पीपल्स पल्स, पोलस्टर एक्झिट पी-एमएआरक्यू यासह अजून काही एक्झिट पोलने वर्तवलेल्या आकडेवारीनुसार भाजपा राज्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये पोल डायरीनुसार भाजपाला ७७ ते १०८ जागा, मॅट्रीक्सनुसार भाजपाला ८९ ते १०१ जागा, चाणक्यनुसार भाजपा ९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. याबरोबरच महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरणार असून राज्यात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.