२०१९ साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत काही तासांचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झालं होतं, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.”
हेही वाचा : “…तेव्हा तुम्ही का पळून गेला”, भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका!
तुमच्याबरोबर शपथ घेतल्यानंतरही शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, “अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.