नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. यानंतर एकीकडे बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला असताना दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात हे गणित चुकीचं असल्याचं या विजयानं स्पष्ट केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“या विजयाने महाविकास आघाडीला चपराक”

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या विजयापेक्षाही जास्त आनंद झाल्याचं म्हटलं आहे. “आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असं मांडलं जात असलेलं गणित चुकीचं आहे हेही या विजयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“हा विजय म्हणजे ‘नेव्हर गो बॅक’ आहे”

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात मिळवलेला विजय म्हणजे नेव्हर गो बॅक असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकांवेळी बावनकुळेंना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांना बाजूला सारल्याची बरीच चर्चा झाली होती. विधानपरिषद निवडणुकांच्या माध्यमातून त्यांचं कमबॅक झाल्याचं बोललं जात आहे. त्यावर फडणवीस बोलत होते. “ही लेजिस्लेटिव्ह गॅप होती, पक्षात नव्हती. पक्षात दोन पदं सर्वोच्च असतात. त्यातल्या महामंत्रीपदावर बावनकुळे होते. लेजिस्लेटिव्ह पार्टीत हा कमबॅक आहे. तो नेव्हर गो बॅक असा कमबॅक आहे. भाजपा नागपुरात मजबूत आहेच. पण बावनकुळेंच्या विजयामुळे विदर्भातल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; नागपूर, अकोल्यात भाजपानं मारली बाजी!

“काँग्रेसमध्ये जाणं ही भोयर यांची चूक”

दरम्यान, या निवडणुकीपूर्वी ऐन वेळी छोटू भोयर यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला. त्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “भोयर यांना मिळालेलं एक मत त्यांचं स्वत:चं आहे. ते काँग्रेसमध्ये गेले, ही त्यांची पहिली चूक. तिथे गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली, त्यामुळे त्यांना हे जाणवलं. त्यांनी स्वत:चं मत देखील काँग्रेसला दिलं नाही, स्वत:ला दिलं आहे”.

गडकरींच्या मार्गदर्शनाचा उल्लेख

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात निवडणुका लढवल्याचं सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, अमित शाह यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून बावनकुळे, वसंतभाई, राजनसिंह, अमरिश भाई यांना उमेदवारी दिली. नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका आम्ही लढलो. एक निर्णायकी विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीची मतं नागपूरमध्ये आणि अकोल्यात आम्हाला मिळाली. ज्यांनी मतं दिली, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on nagpur mlc election result chandrashekhar bawankule wins pmw