महाराष्ट्रासह संपूर्ण देशात २०२४ लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली.
पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण जेव्हा अनेक गोष्टी करत असतो, तेव्हा आपले विरोधक रोज खोटं बोल पण रेटून बोल, असं करतात. रोज नवीन पुड्या सोडायच्या. एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची. कुठलंही उत्तरदायित्व त्यांच्याकडे नाहीये. कुठलेही पुरावे त्यांच्याकडे नाहीयेत. पण ते सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. यात ते सफल होणार नाहीत.”
“याचं कारण असं आहे की, हे ज्या ज्या वेळी आपल्याकडे बोट करतात, तेव्हा जनता यांना विचारते, तुम्हाला संधी होती, तुम्ही झोपला होतात का? तुम्हाला संधी होती, तेव्हा तुम्ही एकही गोष्ट करू शकला नाहीत. आता पुन्हा तोंड वर करून आम्हाला विचारता, काय झालं? असं विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. जनता आम्हाला विचारू शकते, पण तुम्ही आम्हाला हे विचारू शकत नाहीत. दरवाजे बंद करून ज्यांनी सरकारं चालवली, ते आम्हाला काय विचारणार?” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
हेही वाचा- “महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय. मोदींच्या नेतृत्त्वात देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली. मोदींमुळे देश गरीबीतून बाहेर येतोय. २०२४ चा महाविजय भाजपासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.