काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या विधानामुळे सुरतमधील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. “माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाचीही माफी मागत नाही,” असं विधान राहुल गांधी यांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने “गौरव यात्रा’ काढली. या यात्रेतून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. जे सोन्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणत आहे, अरे जरा शरम करा, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस ‘गौरव यात्रे’त म्हणाले, “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतायत. अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही मला लाज वाटते. कारण त्यांची तेवढी पात्रता नाही. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाहीत. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता, त्या पक्षाच्या नेत्यांनीदेखील सावरकरांचा गौरव केला. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनीही सावरकरांचा गौरव केला.”

हेही वाचा- “…तर तुम्ही मिंध्यांचं काय चाटलं”, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल!

“तुम्ही कुठले कालचे आलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवर म्हणता, पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणतायत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसले आहेत. खरं म्हणजे, ही इतकी शरमेची गोष्ट आहे की, काँग्रेस दररोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे”, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- “…आधी स्वत:च्या कानफटात मारून घे”, ‘त्या’ प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

“उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशाप्रकारचा एक अंक काढला. तेव्हाही उद्धव ठाकरे त्यांचा (काँग्रेस) निषेध करू शकले नाहीत. कारण खुर्ची महत्त्वाची होती. आताही जेव्हा सावरकरांचा अपमान होतो, तेव्हा ‘आम्हाला हे चालणार नाही’, ‘आम्हाला हे चालणार नाही” असं म्हणतात. पण हे सगळं चालूच आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on rahul gandhi for insult veer savarkar bjp gaurav yatra uddhav thackeray rmm
Show comments