Devendra Fadnavis Comments on Raj Thackeray: गेल्या वर्षी महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर चर्चा सुरू झाली ती मुंबईसह राज्यातील इतर महानगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. आधी फेब्रुवारी, मग एप्रिल आणि आता थेट पावसाळ्यानंतर दिवाळीत या निवडणुका होतील अशी चर्चा आहे. पण जेव्हा केव्हा या निवडणुका होतील, तेव्हा महाराष्ट्रातलं राजकीय गणित कसं असेल? याचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात राज ठाकरे नेमके कुठल्या बाजूला असतील? हा उत्सुकतेचा विषय असून त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आहे.

पहिला मुद्दा, महायुती एकत्र लढणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केलं. या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार की एकत्र? यावर मोठी चर्चा पाहायला मिळाली. या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी पडदा टाकला आहे.

मुंबईत महायुती एकत्रच लढणार!

“आगामी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील”, असं फडणवीस म्हणाले. “महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढेल. आम्ही तिघं एकत्र राहू. एखाद्या महापालिकेत कदाचित नाही होऊ शकणार. पण जिथे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी एकत्र लढण्याचाच आमचा निर्णय असेल. मुंबईत आम्ही एकत्रच लढणार हे निश्चित आहे”, असं फडणवीस ठामपणे म्हणाले.

“शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काही महानगर पालिका किंवा जिल्हा परिषदा अशा असतात जिथे अतिशय समसमान ताकद असते. पूर्वीही आम्ही आणि शिवसेना काही पालिकांमध्ये सोबत लढायचो काही ठिकाणी स्वतंत्र लढायचो. कारण शेवटी प्रत्येकाला आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं असतं. त्याशिवाय पक्ष टिकेल कसा? पण साधारण अशा मानसिकतेत आम्ही आहोत”, असं त्यांनी नमूद केलं.

राज ठाकरेंबाबत युतीची भूमिका काय?

दरम्यान, सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तिघांमध्ये चौथा भिडू म्हणून राज ठाकरेंचा मनसे सहभागी होऊ शकतो अशा चर्चेला सध्या उधाण आलं आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नसल्याचे सूतोवाच देवेंद्र फडवीसांनी यावेळी केले.

“राज ठाकरेंच्या बाबतीत आजतरी आमचा काही निर्णय झालेला नाही. आणि त्यांचा निर्णय ते घेतात, दुसरं कुणी घेत नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय ते काय घेतात, तेव्हाची परिस्थिती काय असते, आमची परिस्थिती काय असते यावर सगळं अवलंबून असेल. हे खरंच आहे की आम्ही तिघंच सामावून घेता घेता खुर्ची कमी पडायला लागली आहे. त्यामुळे आमच्यात चौथा सामावून घेता येईल का? असाही प्रश्न आहे. या सगळ्या मुद्द्यांचा त्या त्या वेळी विचार करू”, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं.

Story img Loader