Devendra Fadnavis Latest News : विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमत मिळालं. यानंतर काल (५ डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपा या पक्षांवर विश्वास दाखवला असून त्यांना प्रचंड बहुमत दिलं आहे. त्यामुळे या तीन पक्षांच्या सरकारवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. यादरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीसांनी राज्यात आगामी काळात कोणत्या योजना राबवल्या जातील याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राज्य कायमचे दुष्काळ मुक्त करण्यासाठीची योजना देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. फडणवीस हे डीडी सह्याद्रीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्राने आता कौल दिला आहे. येत्या काळात गोष्टी तर अनेक करायच्या आहेत. योजनादेखील अनेक चालवायच्या आहेत. पण माझा भर हा नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे. कारण मी जलसंपदा मंत्री असताना चार नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करू शकतात. त्यामुळे या प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे”.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे. मागच्या काळात ५४ हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट हातात घेतले आहेत. यामुळे २०२३ साली महाराष्ट्रातील ५२ टक्के वीज अपारंपारिक स्त्रोतातील म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे. याचा फायदा शेती आणि उद्योग या दोन क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे. यांना फायदा झाला तर महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईसाठीच्या योजनांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “२०१६ साली मोदींच्या नेतृत्वात घोषणा केली होती की मुंबईच्या एमएमआर भागातील कोणत्याही भागातून कोणत्याही भागात जाण्यासाठी एक तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोस्टल रोड झाला पुढे बांद्रा-वरळी सी लिंक आहे. त्यापुढे बांद्रा-वर्सोवा सी लिंकचे काम सुरू आहे. वर्सोवा-मढचं काम सुरू होतंय. मढ पासून विरारपर्यंत सी लिंक तयार करायची आहे. जपानच्या सरकारने त्यासाठी ४० हजार कोटी देण्याचे कबूल केले आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल”.
मुंबईथ ३७५ किलोमिटरचं मेट्रो नेटवर्क आपण तयार करत आहोत. सगळी काम होतील तेव्हा मुंबईकरांना दिवसातील तीन तास जास्त मिळतील असेही त्यांनी सांगितले.