स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून मोठी राजकीय चर्चा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसून येत आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यावरून दया याचिका केल्याचं विधान केल्यापासून त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक राजकीय नेतेमंडळींनी त्यावर भूमिका मांडताना समर्थनार्थ किंवा विरोधात तर्क दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुंबईच्या गिरगावातल्या मराठी कट्टा या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांविषयीची आपली भूमिका मांडली आहे. तसेच, सावरकरांच्या महतीविषयी बोलताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एका कृतीचा दाखला देखील दिला आहे.
सावरकर आणि आझाद हिंद सेना!
“१८५७ हे शिपायांचं बंड नसून तो स्वातंत्र्यलढा असल्याचं वीर सावरकरांनी लिहिलं होतं. ते लिखाण रासबिहारी बोस आणि सुभाषचंत्र बोस यांनी पुन्हा मिळवलं, पुनर्प्रकाशित केलं. जेव्हा नेताजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकरलं आणि आझाद हिंद सेना तयार केली, तेव्हा सेनेच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आणि शिपायाला सांगितलं की हे पुस्तक वाचा. स्वातंत्र्यवीरांचे विचार वाचा. ज्यावेळी स्वातंत्र्यवीरांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न सुरू होता, तेव्हा भारताच्या स्वतंत्र राज्याचा झेंडा लावणाऱ्या सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस यांनी खऱ्या अर्थानं सावरकरांच्या विचारांची प्रेरणा आझाद हिंद सेनेला दिली”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
“…हा आश्चर्यकारक असा विचार आहे”
“मी फार लहान माणूस आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्यासाठी. त्यांच्या आयुष्याच्या एकेका पैलूवर तास-तासभर बोलणारे वक्ते आहेत. अशा प्रकारे त्यांच्या जीवनातले विचार आपल्यासमोर येतात, की असं वाटतं ऐकतच राहावं. एका व्यक्तीमध्ये इतकं धाडसं, इतकी ऊर्जा, इतकं पांडित्य कशामुळे येऊ शकतं, हा आश्चर्यकारक असा विचार आहे”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
“जे लोक बुद्धिभेद करत आहेत…”
“राष्ट्रभक्ती, देशभक्तीशी बांधिलकी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर देशाकरता मोठे आहेतच. पण मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारेही आहेत. अशा सावरकरांच्या विचारांवर चालत असताना देशात जे काही लोक बुद्धिभेद करत आहेत, अशा तथाकथिक बुद्धिवाद्यांना सावरकरांच्या विचारांनीच आपण उत्तर देऊ शकतो असा मला विश्वास आहे. जो शाश्वत विचार सावरकरांनी मांडला आहे, तो कुणीच समाप्त करू शकत नाही. या देशाला, संस्कृतीला, मराठीला जे सावरकरांनी दिलं आहे, त्यासाठी मी सावरकरांसमोर नतमस्तक होतो”, असं देखील फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.