Devendra Fadnavis On Ramdas Kadam : विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र, आता महायुतीमध्येही धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
रामदास कदम यांनी म्हटलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा. तसेच ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतात, आमचंही मनं दुखावलं जातं. मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत.
हेही वाचा : Devendra Fadnavis : “…तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“रामदास कदम हे वारंवार अशा पद्धतीने टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मनंही दुखावली जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. त्यांच्या विधानाला उत्तरादाखल बोलताना आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील. पण जे मोठे नेते आहेत, त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला वारंवार अशा प्रकारचं बोलणं आम्हाला मान्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
“लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी सर्व प्रयत्न केले. पण तरीही त्यांना ती योजना बंद करता आली नाही. आता लाडकी बहीण योजनेला त्यांच्याकडे कशा पद्धतीने खेचता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, जनता त्यांना प्रश्न विचारेल की तुम्हाला एवढ्या वेळा संधी मिळालीतेव्हा तुम्हाला बहिणींची आठवण का आली नाही? राज्यातील लाडक्या बहिणींनाही माहिती आहे की त्यांच्यापाठिमागे फक्त महायुती सरकार आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
रामदास कदम काय म्हणाले होते?
“मुंबई-गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरे कशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत”, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.
रवींद्र चव्हाण यांनी काय प्रत्युत्तर दिलं?
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्यानंतर संतप्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी कदम यांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, “गेल्या ४० वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार, मंत्री म्हणून कोकणाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे”, असं प्रत्युत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं.
© IE Online Media Services (P) Ltd