Devendra Fadnavis On MLA Sanjay Gaikwad : शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतंच महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही’, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं होतं. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या या विधानासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. ‘मी एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की त्यांना (संजय गायकवाड यांना) कडक समज द्या, अन्यथा अॅक्शन घेतली जाईल’, असा सूचक इशाराच फडणवीसांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आमदार संजय गायकवाड यांच्या विधानासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं की पोलिसांबाबत असं बोलणं योग्य नाही. मी स्वत: या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या. हे असं चालणार नाही, हे योग्य नाही. तरीही ते जर वारंवार असं बोलत असतील तर त्यावर अॅक्शन घेतली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आमदार संजय गायकवाड काय म्हणाले होते?
संजय गायकवाड यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता की, आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावर संजय गायकवाड यांनी म्हटलं की, “आम्हाला धमक्या येतात. जे समाजात चांगलं काम करतात, त्यांना धमक्या येतात. पोलीसवाले काही करू शकत नाहीत. माझ्या घरची गाडी उडवण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा पोलिसांकडून काय चौकशी झाली? काहीही चौकशी झाली नाही”, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.
“महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नसेल. पोलीस खातं म्हणजे शासनाने कोणताही कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला. गुटखा बंदी केली की यांचा हप्ता वाढला, दारू बंदी केली की यांनी चालू करायची की लगेच त्यांचा हप्ता वाढला. राज्यातील आणि देशातील पोलिसांनी इमानदारीने काम जर केलं तर जगातील सर्व गुन्हेगारी समाप्त होऊ शकते. फक्त पोलिसांनी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे”, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं.
“आता एक बातमी अशी वाचली की एक पोलीसवाला चोरांचा मास्टरमाइंड निघाला. तसेच बुलढाण्यात दोन पोलीस कर्मचारी असे होते की, त्यांची चोरांच्याबरोबर भागेदारी होती. त्या चोरांना पकडायला गेलं की हे आधीच त्यांना फोन करायचे, एवढंच नाही तर त्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा, आता मी त्यांचं नाव सांगणार नाही. राज्यातील पोलिसांनी कधी खरंच इमानदारीने काम केलं तर सर्वजण सुतासारखे सरळ होतील, गुन्हेगारी संपेल”, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं.