टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. या पार्श्वभीमीवर मुंबईत (४ जुलै) भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय संघाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतीय संघाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्हवर उपस्थित होते. एवढंच नाही तर मुंबईत काल रात्री (४ जुलै रोजी) उशिरापर्यंत पार पडलेल्या विजय परेडमध्ये लोकांनी रस्त्यावर थांबून जल्लोष साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना कालच्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गर्दीवर भाष्य केलं आहे. “कालची गर्दी पाहता लोकं घरी जाईपर्यंत गृहमंत्री म्हणून आपली विकेट तर जाणार नाही ना? अशी परिस्थिती होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “रोहितनं एकट्यानं नाही तर आम्ही सर्वांनी बघितलं असतं”, सूर्यकुमारच्या कॅचवर बोलताना अजित पवारांची फटकेबाजी

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“सर्व खेळाडू आपल्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला या सर्व खेळाडूंनी धन्य केलं आहे. आज या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे सर्वांचे मी मनापासून अभार मानतो. कारण काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो. गृहमंत्र्यांकरता एवढे मोठे लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते सर्व लोक घरी जाईपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना? अशा प्रकारची परिस्थिती असते”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, “पण खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित होतं. मात्र, अपेक्षेच्या तुप्पट लोकं आले. मुंबईकरांचं जे प्रेम आहे, ते काल ओसांडून वाहत होतं. मात्र, मुंबईकरांनी कुठेही शिस्त मोडली नाही. त्यासाठी मुंबईकरांचंही मनापासून अभिनंदन करतो”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on t20 world cup team india mumbai victiory parade and home minister post mumbai police gkt
First published on: 05-07-2024 at 20:45 IST