अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथे आज राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होती. या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांची माहिती जनतेला दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्र सोडलं.
आमचं सरकार लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. बंद दाराआड बसणारं सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, फेसबुकवर बोलणारं सरकार नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. खरं तर, राज्य सरकारकडून सध्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथे १२ वा कार्यक्रम पार पडला.
हेही वाचा- मोठी अपडेट: नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींना कळकळ आहे. काहींना वाटतंय आमचा हा बारावा कार्यक्रम आहे, त्यातून आपले बारा तर वाजणार नाहीत ना. त्या सगळ्यांना सांगतो, की ३६ जिल्ह्यात असे कार्यक्रम होतील. ३५६ दिवस अशा प्रकारे आमचं सरकार लोकांच्या दारापर्यंत जातच राहील. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. हे बंद दाराआड बसणारं सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही. म्हणून आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत, पोहोचत राहणार आहोत.यातून निश्चितपणे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहोत.”