भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचं दुकान आम्ही का बंद केलं? याचं कारणही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिलं. ते अकोला येथे बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१९ साली उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसला. ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन खुर्चीच्या मोहाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. तेव्हा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं की,’मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा’. त्यानंतर मी परत तर आलोच, पण एकनाथ शिंदेंनाही बरोबर घेऊन आलो.”

हेही वाचा- मनिषा कायंदेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मोठा निर्णय

“पण ते (उद्धव ठाकरे) अजूनही भाषणं ठोकतायत. ते अजूनही जागे झाले नाहीत. लोक रोज त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. ४० आमदार नाकाखालून निघून गेले आणि यांना समजलंही नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली.

हेही वाचा- “देवेंद्रजी, हिंमत असेल तर…”, मोदी-शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!

…म्हणून उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं- फडणवीस

“मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरेंनी एकदा सांगितलं होतं. ज्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, त्यादिवशी मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन, पण त्यांच्याबरोबर जाणार नाही. पण उद्धव ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा जिवंत केला. जो हिंदुत्वासाठी आणि भारतवर्षामध्ये हिंदुत्वाचं जागरण करण्यासाठी शिवसेनेच्या रुपाने मजबुतीने उभा आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on uddhav thackeray why he break shivsena rmm
Show comments