Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या काही मैत्रिणींची मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोरांनी छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचीच लेक सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होत आहे. खडसे यांच्या मुलीबरोबर तिच्या सुरक्षेसाठी गणवेशातील पोलीस कर्मचारी देखील होता. मात्र टवाळखोरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यासही दमदाटी केल्याचं खडसे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. रक्षा खडसे यांची मुलगी व स्वतः रक्षा खडसे यांनी याप्रकरणी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व मंत्री रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी घडलेल्या प्रकारानंतर संताप व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत घटनेची माहिती दिली. खडसे म्हणाले, “राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वाढत आहेत. अशा घटनांनंतर मुली, महिला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला घाबरतात. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये.”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी या प्रकरणामध्ये आहेत. त्या लोकांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलं आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. इतर आरोपींना लवकरच अटक केली जाईल. परंतु, अशा प्रकारे छेडछाड करणं, सार्वजनिक ठिकाणी मुलींना त्रास देणं अतिशय चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल”.

या घटनांना आळा बसायला हवा : रक्षा खडसे

या घटनेवर रक्षा खडसे यांनी देखील भाष्य केलं. त्या म्हणाल्या, सरकारने आम्हा लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी पोलीस दिले आहेत. कुटुंब म्हणून आम्ही एखादा सुरक्षारक्षक आमच्या कुटुंबातील सदस्याबरोबर पाठवला असेल तर तिथे तरी कोणाची अशी हिंमत व्हायला नको. गणवेशातील पोलीस असूनही अशी घटना घडली कोणी पोलिसावरही दादागिरी करू शकतो त्यामुळे कुठे ना कुठेतरी अशा लोकांचा उपद्रव वाढत चाललाय. असं म्हणावं लागेल. अशा घटनांना आळा बसणे गरजेचे आहे.

Story img Loader