Devendra Fadnavis On Vinod Tawde : विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये मोठा गोंधळ घातला. भाजपा आणि बविआ कार्यकर्ते आपापसांत भिडल्याचंही पाहायला मिळालं . हा सर्व प्रकार जवशपास चार तास सुरु होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केलं. या संदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणानंतर विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे, तर हे आरोप भाजपाकडून फेटाळण्यात आले आहेत. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विनोद तावडे यांच्याकडे कोणतेही पैसे सापडलेले नसून या प्रकरणात ते कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेलेले नव्हते. तसेच कोणतेही पैसे वाटलेले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“खरं म्हणजे निवडणुकीत जेव्हा पराभव दिसायला लागल्यानंतर जो प्रकार होतो. त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. त्या ठिकाणी फक्त ते कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे कोणतेही पैसे सापडलेले नाहीत. आक्षेप घेता येतील, अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्याकडे सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच आमचे राजन नाईक जे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहेत. त्यांच्यावरही हल्ला झालेला आहे. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीची युको सिस्टम आहे, त्या युको सिस्टमने उद्याचा दिसणारा पराभव पाहता तो कव्हर करण्यासाठी अशा प्रकराचं कव्हर फायरिंग केलं आहे. विनोद तावडे या प्रकरणात कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेलेले नाहीत, कोणतेही पैसे वाटलेले नाहीत आणि कोणलाही पैसे मिळालेले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडेंनी सर्व आरोप फेटाळले
पैसे वाटप आरोप प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की भाजपाच्या नेत्यांनी टीप दिली हे देखील खोटं आहे. आता या आरोपानंतर हितेंद्र ठाकूर गाडीत जाताना काय बोलले ते मला माहिती आहे. त्यामुळे यात काहीही तथ्य नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं.
“मी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटत असतो. त्या अनुषंगाने मी राजन नाईक यांना फोन केला की काय परिस्थिती आहे? तर ते म्हणाले की, सर्व व्यवस्थित सुरु आहे. आम्ही या ठिकाणी बसलो आहोत तर चहाला या. आम्ही त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी गेलो. एवढं साधं आहे. पण शंका आली आहे ना? तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही तपासा, काही मिळालं तर कारवाई करा. माझं काहीही म्हणणं नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.