वीर सावरकर गौरव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावत आणि शहरांमध्ये निघाली. वीर सावरकर यांचा गौरव आपल्या मनात आहे. मग ही गौरव यात्रा काढण्याची वेळ आपल्यावर का आली? कारण या देशामध्ये काही लोकं असे जन्माला आले आहेत, ज्यांना देशाचा इतिहासही माहित नाही. वर्तमान माहित नाही, ज्यांना स्वतःला भविष्य नाही. ज्यांच्या पक्षाला भविष्य नाही पण असे लोक रोज उठून वीर सावरकरांना शिव्या देतात म्हणून ही गौरव यात्रा आपण काढली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरला केलेल्या भाषणात राहुल गांधींना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच राहुल गांधींना खुलं आव्हानही दिलं आहे.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
राहुल गांधी काय म्हणतात? मै माफी नहीं मांगूगा मै सावरकर नहीं हूँ.. अरे नादान माणसा ना तू सावरकर होऊ शकतो ना तू गांधी होऊ शकतो. तू सावरकरही नाहीये आणि तू गांधीही नाहीस. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमानच्या छोट्याश्या खोलीमध्ये आपल्या घरी जेवढा संडास असतो तेवढ्याश्या छोट्या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना डांबलं होतं. तिथे अंधार असायचा, उजेड यायचा नाही. त्याच ठिकाणी मलमूत्र विसर्जन करावं लागायचं. अरे राहुल गांधी एक रात्र त्या खोलीत राहून दाखव. मी एसी लावून देतो राहून दाखव पण तू नाही राहू शकत आणि तुम्ही काय सावरकरांचं नाव या ठिकाणी घेत आहात? असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलं आहे.
वीर सावरकर स्वातंत्र्यलक्ष्मीची आराधना करत होते
ज्या वीर सावरकरांनी क्रांतिकारकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली ते वीर सावरकर होते. वीर सावरकर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना करणारी कविता हा तरूण (वीर सावरकर) लिहितो. तेराव्या वर्षी आपल्या मित्रांना एकत्र करून त्या ठिकाणी स्वातंत्र्य लक्ष्मीसाठी शपथ घेतो आणि सातत्याने स्वातंत्र्याची आराधना करताना कशा प्रकारे आपला देश स्वतंत्र होऊ शकेल याचाच विचार ज्यांच्या मनात आहे. तुम्ही विचार करा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी विदेशी वस्तूंवर बहिष्कार करायला सांगितलं त्यावेळी वीर सावरकरांचं वय काय होतं? त्यावेळी वीर सावरकर कुठल्या विचारांनी प्रेरित होते.
१८५७ चा उठाव होता हे वीर सावरकरांनी सांगितलं
वीर सावरकर ज्यावेळी लंडनला गेले होते त्या ठिकाणी इंडिया हाऊसमध्ये बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतात. बंदुका भारतात कशा पाठवायच्या याचं अनुसंधान करतात आणि सशस्त्र क्रांतीचा नारा देत एक एका भारतीय क्रांतिकाराला प्रेरित करतात. पहिल्यांदा मॅझेनीचं चरित्र लिहितात आणि त्यानंतर १८५७ ची लढाई हे शिपायांचं बंड नव्हतं तर ती लढाई म्हणजे पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं हे सांगणारे आणि लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याही काळात ते पुस्तक छापू दिलं नाही. शेवटी हाताने लिहिलेली कॉपी भारतात आणली गेली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी हातानी लिहून त्याच्या प्रति तयार केल्या. त्यानंतर त्यातून पहिल्यांदा लोकांच्या मनात ही भावना निर्माण झाली की १८५७ चा उठाव हे शिपायांचं बंड होतं हा इंग्रजांनी सांगितलेला इतिहास चुकीचा आहे. ते शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम होता.
एका पिढीला असं वाटायचं की..
१८५७ ची लढाई चिरडली त्यानंतर एक पिढी भारतात अशी निर्माण झाली होती ज्या पिढीला वाटायचं की इंग्रजांचा सूर्य बुडूच शकत नाही. त्या पिढीला वाटायचं की इंग्लंडच्या राणीच्या मनात येईल की आता खूप झालं भारताला स्वातंत्र्या देऊन टाकू. त्यादिवशी संसदेत प्रस्ताव येईल त्यानंतर तो प्रस्ताव आला की भारत स्वतंत्र होती. असं मानणारी पिढी त्या काळात होती. त्या पिढीला लोकमान्य टिळक यांनी सांगितलं की स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो विचार लोकमान्य टिळक यांनी त्या पिढीला दिला. त्याचवेळी तसाच विचार देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. मदनलाल धिंग्रा यांनी त्यावेळी कर्झन वायलीचा वध केला त्यानंतर इंग्रजांना समजलं की वीर सावरकर ही अशी व्यक्ती आहे की ते भारतात क्रांतीचं बिजारोपण करू शकतात. त्यानंतरच इंग्रजांनी वीर सावरकरांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. नंतरचा इतिहास आपल्याला माहित आहे. विचार करा, वीर सावरकर हे जर माफीवीर असते तर इंग्रजांच्या १५० वर्षांच्या राजवटीने कुठल्या एका व्यक्तीच्या मागे गुप्तहेर लावण्यात पैसा खर्च केला असेल तर तो वीर सावरकर यांच्यावर केला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वीर सावरकरांवर ब्रिटिशांचे अन्वनित अत्याचार
इंग्रजांना माहित होतं की वीर सावरकर म्हणजे व्यक्ती नाही तर अॅटमबॉम्ब आहे. वीर सावरकांना अटक केली. त्यांची डिग्री रद्द केली. स्वातंत्र्यवीर सावरकर लेचेपेचे नव्हते. त्यांनी आधीच प्लानिंग केलं आणि पत्र लिहिलं आपल्या मित्राला की मार्सिलिसच्या जवळ गेल्यानंतर मी उडी मारणार आहे. तू मला घ्यायला ये. ठरल्याप्रमाणे त्यांनी उडी मारली आणि मार्सिलिसच्या बंदरावर ते पोहचले. त्यावेळी मित्राला यायला उशीर झाला आणि फ्रेंच पोलिसांनी त्यांनी ब्रिटिशांच्या हवाली केलं. वीर सावरकरांच्या विरोधात खटला सुरू झाला. त्यांना आधी एक जन्मठेप ठोठावली गेली त्यानंतर दुसरी जन्मठेप ठोठावली गेली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की तुम्ही दोन जन्मठेपांची शिक्षा मला देता तोपर्यंत तुमचं राज्य राहणार आहे का? हे सांगण्याची धमक असलेले वीर सावरकर होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.