Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. राज्याच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार आता सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा असं तीन चाकांचं सरकार सध्या महाराष्ट्राच्या गादीवर आहे. दरम्यान, अजित पवारांनी बंड करण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तसंस्था एएनआयला एक मुलाखत दिली होती. त्यावर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याबरोबर येईल का? असा प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी आजच्या राजकीय परिस्थितीच्या अगदी उलट उत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी, २ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून काही आमदारांसह राजभवनात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्याआधी २९ जुलै रोजी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुलाखतीत राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याबरोबर येईल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की, “हा शरद पवारांचा पक्ष आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे की आपल्याला विरोधकांसह जायचं आहे. त्यामुळे ते येणार नाहीत.”

देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत हे वक्तव्य केल्यानंतर लागलीच दोन दिवसांनंतर अजित पवारांनी बंड केलं आहे. या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा नसल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय. तर, या पक्षांतर्गत आता कुरघोडी सुरू झाल्याने राष्ट्रवादीबाबत नेमकं पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा >> राष्ट्रवादीत बंड होण्याच्या दोन दिवस आधीच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत केलं होतं ‘हे’ वक्तव्य

वारसा पुढे चालवण्याची तयारी सुरू

“शरद पवार यांचं वय झालं असलं तरीही ते अजून फिट आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या या वयातही राजकारणाविषयी ते प्रचंड सतर्क आहेत. देशातल्या अशा राजकारण्यांमध्ये शरद पवारांची गणना होते ज्यांना राजकारण मूळापासून माहित आहे. प्रत्येक फॅमिली पार्टीप्रमाणे शरद पवारांनाही हे वाटतं की आपला वारसा पुढे चालावा. त्यामुळेच तर त्यांनी सुप्रिया सुळेंना पुढे केलं आहे. जर शरद पवारांना बॅकफूटवर जायचं असतं तर त्यांनी सुप्रिया सुळेंना किमान प्रदेशाध्यक्ष केलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं आहे. मात्र असं कुठलं पदच नाही. प्रफुल्ल पटेल यांनाही हे पद देण्यात आलं आहे. मात्र आपला वारसा पुढे चालावा याच्या तयारीची ही सुरुवात आहे.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis podcast with ani revealed about ncp alliance what he say before ajit pawar split ncp sgk