राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल अंतिम टप्प्यात आले आहेत. या निवडणुकीत भाजपासह महायुतीची सरशी पाहायला मिळत आहेत. तर ठाकरे गटासह शरद पवार गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. या निवडणूक निकालाची आकडेवारी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं अभिनंदन केलं आहे.
‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७५० हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा- छगन भुजबळांमागे मास्टरमाइंड कोण? मनोज जरांगेंचं हटके उत्तर; म्हणाले, “हे लफडं…”
“राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या १४०० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.
“राज्यातील जनतेवर अतोनात सूड उगवणार्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला,” असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला.