केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात तीन ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजपा मात्र नारायण राणे यांची पाठराखण करताना दिसत आहे. अनेक भाजपा नेत्यांनी राणेंच्या समर्थनार्थ मतं व्यक्त केली आहेत. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावेळी पोलिसांचा राज्यात गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याबद्दल पत्रकारपरिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, “शर्जील उस्मानी राज्यात येतो आणि भारत मातेबद्दल बोलतो मात्र कारवाई होत नाही.आता इथे पोलीस राणेंवर कारवाईसाठी निघाले आहेत. पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे. सरकारने बस म्हटल्यावर काही लोक लोटांगण घालत आहेत. केवळ काही लोकांना खुश करण्याकरता हे करत असतील तर ते महाराष्ट्रसाठी योग्य नाही.”
हेही वाचा – भाजपा राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही पण…; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ते पुढे म्हणाले, “ठाकरे सरकार पोलीस जीवी सरकार झालेलं आहे. माझा सल्ला आहे पोलिसांनी कायद्याने काम करावे. कायद्याच्या भाषेत हा दखलपात्र नाही. पण त्याला जबरदस्तीनं दखलपात्र गुन्हा करायचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा गैरवापर होतोय. महाराष्ट्र पोलिसांचं काम मला माहित आहे. ते निष्पक्ष आहेत. पण आता त्या पोलिसदलाचा ऱ्हास होतोय”.