Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, अनिल देशमुखांचा या आरोपांना आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे नुकताच एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना अनिल देशमुखांच्या आरोपांबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? याच उत्तर आधी त्यांनी द्यावं, असा प्रश्न त्यांनी विचारला.
हेही वाचा – ‘मविआ’ सरकारच्या काळातच टाटा एअरबस, अन्य प्रकल्प राज्याबाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“अनिल देशमुख यांनी परवा ट्वीट केलं आणि सांगितलं त्यांना तुरुंगात मोठा त्रास झाला. आता ते तुरुंगात कधी गेले, तर ते नोव्हेंबर २०२२ मध्ये, तेव्हापासून ते ११ महिने तुरुंगात होते. त्यापैकी आठ महिने त्यांचे सरकार होतं. मग त्यांच्याच सरकारने त्यांना त्रास दिला का? असा प्रश्न निर्माण होतो. मुळात अनिल देशमुखांनी आताच हे बोलणं का सुरु केलं? असाही प्रश्न आहे. खरं तर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एक योजना तयार केली होती. देवेंद्र फडणवीसांना बदमान करायचं हा योजनेचा मुख्य उद्देश होता. त्यातून एक दिवस कपोलकल्पीत कथा अनिल देशमुखांनी सुरु केली. आणि आता त्याचं पुस्तक लिहिलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मनसूख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं?”
“जर तुम्ही न्यायालायाचा निर्णय वाचला, तर त्यात सगळंच स्पष्ट होईल. अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे आयुक्त होते. त्याची दखल मुख्य न्यायाधीशांनी घेतली. त्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालय सांगितलं की पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. हे सगळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घडलं. हे सगळं होत असताना माझा अनिल देशमुखांना एकच प्रश्न आहे , तो म्हणजे मनसूख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं? मी सदनात याची माहिती दिली होती. मनसूख हिरेनला गायब करण्यात आलं असून त्याची हत्या होऊ शकते, असा संशय मी व्यक्त केला होता. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचं समजलं”, असेही ते म्हणाले.