शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी ( १२ फेब्रुवारी ) गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केलं. आपण एकत्र आलो नाही तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावे लागेल. तसेच, निवडणुका घेण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं होतं.
उद्धव ठाकरेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरे असं काहीतर बोलत असतात. सध्यातरी भारताच्या संविधानाप्रमाणे एकत्र निवडणुका होत नाहीत. उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे; त्याला समर्थन द्यावं. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ,” असं देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.
हेही वाचा : “…ही तुमची मर्दुमकी नाही”, कोश्यारींचा ‘गोल्डन गँग’चे सदस्य उल्लेख करत शिवसेनेचं पंतप्रधानांवर टीकास्त्र
‘आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही भाजप म्हणजे हिंदूत्व नाही’ असं उद्धव ठाकरे म्हटलं, याबद्दल विचारलं असता फडणवीसांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंना जैन आणि उत्तर भारतीयांची आता आठवण येत आहे. त्याचप्रमाणे कोण हिंदुत्ववादी आहे आणि नाही हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहून उर्दूत कॅलेंडर काढले, हे सर्व जनतेने पाहिलं आहे,” असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा : “हेच मी केलं असतं तर…”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ कार्यक्रमातील उपस्थितीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल!
“…तेव्हा बाळासाहेबांनी कोणाचीही पर्वा न करता मोदींना वाचविले”
“पंतप्रधान मोदी यांचे जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना वाचवले होते,” अशी आठवण सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “सेना- भाजप युतीच्या काळात ही युती अन्य पक्षांसाठी अस्पृश्य होती. आम्हाला वाळीत टाकल्यासारखे होते. कोणी साथ देत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी कोणाचीही पर्वा न करता मोदींना वाचविले. बाळासाहेबांनी त्यांना वाचविले नसते तर ते आज जेथे बसलेत तेथे पोहोचलेच नसते.”