Devendra Fadnavis reaction on his Office vandalized: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने गोंधळ घालत नासधूस केली. या घटनेवर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कार्यालयात नासधूस झाल्याची घटना कालची आहे. त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे कशाकरीता केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्विगणतेमधून तिने हे कृत्य केले का? किंवा तिची व्यथा काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.”

दरम्यान लाडक्या बहि‍णीचा राग अनावर झाला म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयात तिचा असंतोष पाहायला मिळाला, अशी टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेबाबतही फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ. कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही पाहून घेऊ. आता माझे म्हणणे एवढेच आहे की, संबंधित महिलेची व्यथा समजून घेऊ.”

हे वाचा >> Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात अज्ञात महिलेचा असंतोष; मंत्रालयातील कार्यालयाबाहेर घातला गोंधळ, नावाची पाटी खेचत घोषणाबाजी!

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, व्हिडीओ पाहा :

गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नसेल तर लाडक्या बहिणी कशा सुरक्षित राहतील? असाही प्रश्न यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विरोधकांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी रॉकेल ओतून घेतलेले आहे. मंत्रालयात कुणाचीच अडवणूक केली जात नाही. काही लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी वरच्या मजल्यावरून जाळीवर उडी घेतात. याचा अर्थ ते आमचे विरोधक नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मंत्रालयाचे दरवाजे सामान्यांसाठी बंद करू शकत नाही.

अमित शाह यांच्या दौऱ्यावर काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत. बैठकांचे सत्र सुरू आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे कार्यकर्त्यांशी विभागवार बैठक घेऊन संवाद साधत आहेत. आता केवळ मुंबई आणि कोकण विभाग उरला आहे. १ ऑक्टोबर रोजी ते या दोन्ही विभागांना भेटी देऊन ते बैठका घेतील.