“महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी संदर्भात ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्या घटना गंभीरच आहेत, ते मी नाकारत नाही. त्यामुळे या घटनांचा राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे योग्य नाही. प्रत्येक घटनांमागे वैयक्तिक कारणे किंवा हेवेदावे आहेत. त्याहीबाबत जी कारवाई करायची आहे ती आम्ही करत आहोत”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
‘महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला’, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका; म्हणाले, “फडतूस, कलंक शब्द..”
श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस, कलंक असे शब्द वापरले होते. पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत. महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता, मला हे ठामपणे वाटते की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी आता एवढेच म्हणेण की, गेट वेल सून. मी त्यांना बाकी काहीही प्रतिक्रिया देणार नाही.”