अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ पक्ष चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी दिला. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर अजित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित होता. मागच्या दहा ते पंधरा वर्षात निवडणूक आयोगाने जसे निर्णय दिले आहेत ते विविध प्रकरणांमधले असले तरीही अशाच प्रकारचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळणार याचा आम्हाला विश्वास होताच. संख्याबळ त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. २०१९ मध्ये लोकशाहीचा कौल नाकारण्यात आला. लोकांनी दिलेल्या निकालाशी प्रतारणा करण्यात आली. मतदार राजाने जे केलं त्याची राजकीय तोडफोड करण्यात आली. २०१९ ला ज्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्यांना लोकशाहीने जागा दाखवली. आज ते लोकशाहीच्या नावाने गळे काढत आहेत मात्र लोकशाहीची ताकद असते ते या निकालाने दाखवून दिलं.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. हे दोन्ही पक्ष बरोबर लढले होते. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे या मागणीवर शिवसेना ठाम होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सह हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीत ते मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षांनी त्यांच्या पक्षात बंड झालं. तर गेल्यावर्षी अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर ती लढाई निवडणूक आयोगासमोर होती. निवडणूक आयोगाने बहुमताचा आधार ठरवत पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction on ajit pawar election commission sharad pawar and uddhav thackeray scj