Devendra Fadnavis on Akshay Shinde Encounter : पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी नेत असताना ही घटना घडली. या घटनेत सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे जखमीही झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“या प्रकरणातील आरोपीच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. यासंदर्भात चौकशी करण्याकरिता त्याला नेण्यात येत होतं. त्यावेळी त्याने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही स्वरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार त्याचा मृत्यू झाला आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीत ठार; मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“विरोधीपक्षांनी आरोपीची बाजू घेणं चुकीचं”

दरम्यान, या घटनेनंतर आता विरोधकांकडून या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात विचारलं असता, “विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं. हा तोच विरोधीपक्ष आहे, जो आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता. मात्र, आता आरोपीने पोलिसांवर गोळाबार केला, तेव्हा विरोधीपक्षाकडून आरोपीची बाजू घेतली जात आहे. हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा – बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार

अशातच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रॉंच टीमने त्याला ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला यात तो ठार झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction on akshay shinde badlapur school girl molestation accused police firing spb