Devendra Fadnavis on Anil Deshmukh Attack : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद उमटत असून सत्ताधारी भाजपने ही घटना बनावट असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या या आरोपाला सलील देशमुखांसह महाविकास आघाडीने प्रत्युतर दिले असून भाजपनेच हल्ला घडवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अनिल देशमुखांवरील हल्ल्याला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाचं विशेषण दिलं आहे. दगड मागून लागला तर पुढे कशी जखम झाली? असा प्रश्नही त्यांनी विचारला. आज ते माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस आयुक्तांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. यामुळे तिथलं चित्र स्पष्ट झालं आहे. आता प्रश्न निर्माण झालं आहे की, दहा किलो गोटा विंडशिल्डवर मारला तर विंडशिल्ड तुटली का नाही? साधं बोनेटला स्क्रॅचही का नाही? एकच गोटा आतमध्ये दिसलाय. हा गोटा मागची काच फोडून मारला आहे. मागच्या काचेतून दगड मारला तर मागे दगड लागला पाहिजे. तो समोर कसा लागला. असा दगड फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये मारला जाऊ शकतो, जो मागून मारला तरी गोल फिरून समोर येऊन डोक्याला लागतो.”
हेही वाचा >> Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवरील हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोप!
“एक किलोचा दगड लागला तर फक्त खुना का आहेत, जखम का दिसत नाही. यातून एकदम स्पष्ट होतंय की हा सिनेमा तयार करण्यात आलाय”, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला.
विरोधकांना पुरून उरणार
भाजपच्या लोकांनी दगड मारले किंवा गोळ्या झाडल्या तरी अनिल देशमुख मरणार नाही. त्यांना पुरून उरणार आहे. त्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी भाजपला इशारा दिला. उपचारानंतर मंगळवारी रुग्णालयातून घरी परतले या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते.
‘डम्पडाटा’ आणि सीसीटीव्ही फुटेज घेणार ताब्यात
हल्ला झालेल्या मार्गावर असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच घटनास्थळाजवळील मोबाईल टॉवर लोकेशनसाठी ‘डम्पडाटा’ काढण्यात येणार आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्याचाही तपासात उपयोग होईल. एआयचा वापर करून घटनेची ‘रि-क्रिएशन’ करून गुन्ह्याचा तपास करणार येईल, अशी माहिती अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.