मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांसोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी गौप्यस्फोट केलेत. भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबत २०२१ मध्येच उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. मात्र, जुलैमध्ये भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झाल्यानंतर हा विषय फिस्ककटला, असा दावा शेवाळेंनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर फडणवीसांनी बोलणं टाळलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आत्ता विभागीय आयुक्त कार्यालयात आहे आणि ही पूरपरिस्थितीची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे दोन्हींच्या नियमांमध्ये राजकीय प्रश्नांची उत्तरं बसत नाहीत.”
“जाणीवपूर्वक काही भागात वीज बंद करण्यात आली”
पाऊस आणि पूरस्थितीत अनेक भागात वीज नसल्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, “सध्या जाणीवपूर्वक काही भागात वीज बंद करण्यात आली आहे. कारण अशापरिस्थितीत अपघात होऊ शकतात, तर काही भागात ट्रान्सफॉर्मरच्या वर पाणी गेलंय. अशा ठिकाणी ते पाणी कमी होईपर्यंत वीज बंद ठेवणंच हिताचं असतं. असं असलं तरी या भागांमधील वीज लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठीही आम्ही आदेश दिले आहेत.”
“ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेलेत तेथे वीज बंद केली”
“हिंगणघाटसारख्या शहरांचा विचार केला तर येथील मोठ्या भागातील वीज बंद होती. आता टप्प्या-टप्प्याने ही वीज सुरळीत होत आहे. ग्रामीण भागातही तीच स्थिती आहे. जेथे ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेलेत तेथे वीज बंद केली आहे. मात्र, लवकरच ती सुरू होईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.
“तातडीने करायची काम व दीर्घकालीन कामं याचे अहवाल मागितले”
देवेंद्र फडणवीस पुरस्थितीवर बोलताना म्हणाले, “पुरामुळे पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी लहान पूल कोसळले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे बसेसला फेरा मारून जावं लागेल अशी स्थिती आहे. याबाबत तातडीने करायची काम व दीर्घकालीन कामं याचे अहवाल मागितले आहेत. ती कामं करण्याचा आढावा घेतला जात आहे. मागील आकडेवारी पाहिली तर सप्टेंबर महिन्यात देखील काही प्रमाणात अतिवृष्टी होते. हे चक्र बदललं आहे. आतापर्यंत आपलं काम चांगलं राहिलं आहे.”
“मदतीचा वेळ कमीत कमी कसा असेल यावर भर”
“आपण अनेक लोकांचे जीव वाचवू शकलो. कारण तेथे वेळीच एसडीआरएफ, एनडीआरएफची पथकं पोहचली. त्यांनी लोकांना मदत केली. धरणांवरही बारकाईने लक्ष ठेवलं जातंय. कोणत्या धरणातून किती पाणी सोडल्यावर कुठे किती वेळेत पोहचणार आहे याच्या अंदाजावर सगळं नियोजन केलं जात आहे. यात ढगफुटीसारखी एखादी घटना घडली किंवा जास्त पाऊस पडला तर आपलं नियंत्रण राहत नाही. अशावेळी मदतीचा वेळ कमीत कमी कसा असेल यावर भर दिला जात आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा : “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…
“गडचिरोलीला अधिक चिंता”
“गडचिरोलीला अधिक चिंता आहे. कारण सर्व पाणी वाहून गडचिरोलीकडे जात आहे. गडचिरोलीतून पाणी तेलंगणाला जात असताना तिकडेही पूरस्थिती तयार झाली तर या पाण्यामुळे अडचणी तयार होतील. सिरोंचाला याचा अधिक फटका बसला आहे. तिथे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पुढील ४-५ वर्षांचा दीर्घकालीन आराखडा तयार करून गावांचा कायमस्वरुपी संपर्क ठेवण्यावर कामाचे निर्देश दिले आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.