Devendra Fadnavis on Raj Thackeray statement: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतंच विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं होतं. निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असे राज ठाकरे म्हणाले होते. एबीपी न्यूज वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना राज ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर महायुतीमध्ये थोडी अस्वस्थता पाहायला मिळाली. अखेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. काँग्रेसचे मुंबईतील नेते रवी राजा यांच्या पक्षप्रवेशानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचं नाही तर महायुतीचं सरकार येणार

“मी राज ठाकरेंचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकारतो. पण महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येणार नसून महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस माहिम विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये आमची अजून बोलणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मुंबईचे आमचे अध्यक्ष आशिष शेलार चर्चा करत आहोत. आम्ही सर्व एकत्र राहोत, यासाठी मार्ग काढला जात आहे.

हे वाचा >> महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

राज ठाकरेंनी आता व्यापक भूमिका स्वीकारली

राज ठाकरे हे उघडपणे भाजपाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांचे मत भाजपापासून दूर जाईल का? असाही एक प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, लोकसभेलाच याबद्दल मी बोललो आहे. राज ठाकरे यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. तसेच इतर पक्षांच्या प्रादेशिक भूमिकांचे तर आम्ही नेहमीच स्वागत करत आलो आहोत. प्रादेशिक अस्मितेबरोबरच राष्ट्रीय अस्मिताही स्वीकारणे गरजेचे असते. राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व आणि हे राज ठाकरेंनी स्वीकारले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction on raj thackeray statement about next chief minister will become from bjp party kvg