केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज सकाळी त्यांनी गुप्तपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. महायुतीत सामील होण्यासाठी जयंत पाटलांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्याचंही बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतच्या विविध बातम्या समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
अमित शाह यांची मी भेट घेतली नाही. आज सकाळीच मी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये कसलंही तथ्य नाही. अशा अफवांमुळे लोकांमध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरत आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. यानंतर आता जयंत पाटील व अमित शाह यांच्यातील कथित भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- “…तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही”, जयंत पाटलांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं की, काही लोकांना अफवा पसरवायला फार आवडतं. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी किमान खात्री करून बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यात कुठलीही भेट झाली नाही. जे पतंगबाजी करतायत, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपला काहीतरी स्तर राखावा. तसेच अशा घटनेची पुष्टी केल्यानंतरच अशा प्रकारच्या बातम्या द्याव्या.”