पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे. तर, राज्यभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत होत नसल्याने व त्यामुळे नोकरी मिळत नसल्याने स्वप्निलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर, आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून या व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर, या प्रकरणावर माध्यमांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, तेव्हा फडणवीसांनी “एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरूणांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. आम्ही MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही” असं बोलून दाखवलं.
स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येवर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं कुठतरी एकुणच एमपीएसीची जी कार्यप्रणाली आहे, याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, मुलाखती होत नाहीत. आज तिथल्या अनेक जागा देखील रिक्त आहेत. एमपीएससीचे मेंबर्स देखील आपण भरलेले नाहीत. मला असं वाटतं हे योग्य नाही. शेवटी आमची जी ही तरूण मुलं आहेत, अत्यंत अपेक्षेने ही सगळी मुलं अशाप्रकारच्या परीक्षा देतात आणि दोन-दोन वर्षे मुलाखतच झाली नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळे सरकारला देखील आमची विनंती आहे. की एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन, कशाप्रकारे यामध्ये संपूर्ण परिवर्तन करून, याला अधिक आपल्याला कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे.”
स्वप्निल लोणकर या तरूणाची आत्महत्या दुर्दैवी!
एमपीएससीच्या कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन होणे गरजेचे.
या संस्थेला स्वायत्तता दिली असली तरी त्याचा अर्थ स्वैराचार नव्हे!
राज्य सरकारने या कार्यपद्धतीचा फेरआढावा घ्यावा.
मुंबई येथे माध्यमांशी साधलेला संवाद https://t.co/SEp9uQMsYR#Swapnil pic.twitter.com/bnJwdWdHXm— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2021
स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र
दरम्यान, भाजपा नेत्यांकडून आता या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेवरून ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे.
“ MPSC ची परीक्षा पास होऊन देखील नोकरी नाही मिळाली म्हणून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली..सुन्न करणार्या या घटना सांगतात योग्य निर्णय योग्य वेळी नाही घेतला तर निष्पाप लोकांचे जीवन उध्वस्त होते.. जबाबदारी कोणाची व्यवस्थेची ना?” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
स्वप्निल लोणकर आत्महत्या : पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका , म्हणाल्या…
तर,“ स्वप्निल लोणकर या MPSC उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं जीव गेला त्याबद्दल सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडनं अपेक्षित होते की आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत.. स्वप्नील लोणकर या आमच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली.” असं ट्विट करत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.