पुण्यात सोमवारी (१७ ऑक्टोबर) झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घर, दुकानांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचंही नुकसान झालं. त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपावर जोरदार टीका होतेय. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (१९ ऑक्टोबर) दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. काल पुण्यात पडलेल्या पावसाने मागील १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. मागील २४ तासात पुण्यात पडलेला पाऊस सर्वाधिक आहे. हे प्रमाण १०० वर्षांच्या रेकॉर्डपेक्षा थोडा कमी आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे.”

“हे ड्रेनेजचे डिझाईन भाजपाने तयार केलेले नाही”

“ड्रेनेज तयार करताना इतक्या पावसाचा विचार केलेला नसतो. भाजपाची सत्ता पाच वर्षांपूर्वी आली, हे ड्रेनेजचे डिझाईन भाजपाने तयार केलेले नाही. हे ड्रेनेज ४० वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ड्रेनेज लवकर तयार झाले पाहिजेत यासाठी पुणे मनपा निश्चितपणे प्रयत्न करेल. तसेच तशाप्रकारचं डिझाईनही तयार करेल,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

“एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली”

राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडून झालेल्या नुकसानीनंतर विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावर फडणवीस म्हणाले, “जिथे जिथे अतीवृष्टी झाली त्या त्या ठिकाणी आमच्या सरकारने तातडीने मदत केली. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत आम्ही केली. एवढंच नाही, तर जे नियमात बसत नव्हते, मात्र सातत्याने होणाऱ्या पावसाने नुकसान झालं अशा शेतकऱ्यांनाही आम्ही मदत केली.”

हेही वाचा : “भाजपानं स्वप्न दाखवून….”, पुण्यात पावसाचं पाणी भरल्याने अजित पवार संतापले, म्हणाले “फार वाईट अवस्था”

“तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश”

“शेतकऱ्यांमध्येही ही भावना आहे की दोन वर्षे पाऊस पडत होता, पण मदत मिळाली नाही. यावेळी वेळेत मदत मिळाली. हेही खरं आहे की, त्यानंतर पुन्हा आठवडाभरात पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आता पुन्हा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, उभी पिकं उद्ध्वस्त झाली त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश दिले आहेत,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.