Devendra Fadnavis on Sahitya Sammelan : “आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली. यावरून अनेकांनी प्रत्युत्तर दिलं. संमेलनात राजकीय शेरेबाजी झाल्याने नाराजी व्यक्त केली गेली. तसंच, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही याच व्यासपीठावर उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
साहित्य संमेलनातून द्वेष दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात आली. साहित्य संमेलनाचा अशापद्धतीने वापर केला जाणं कितपत योग्य वाटतंय? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत. अनेक साहित्यिकांना वाटतं की राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत. मग त्यांनीही पार्टी लाईनवरील कमेंट्स करणं योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात”, असा सल्लाच देवेंद्र फडणवीसांनी दिला.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, “त्या पक्षात काय चालायचं यावर मी कमेंट करू शकत नाही.”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेट
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. कालही ते एका लग्नसोहळ्यात एकत्र दिसले होते. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता, ते म्हणाले, “या भेटीवर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. आपणही सर्वांनी ९ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करावा हे शिकवलं तर राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल”, असा टोमणाही देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना लगावला.