राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेतली आहे. ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी भावुक झाले आहेत. हा निर्णय लगेच मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं अचानक निवृत्ती घेणं खटकणारी बाब आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ही त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाब आहे. परंतु शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे.
दरम्यान, यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला.. शरद पवार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते की, भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
याचदरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर फडणवीस म्हणाले, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. सध्या मी यावर बोलणं योग्य वाटत नाही. परंतु आम्ही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत.
हे ही वाचा >> “अजित पवार उतावीळ, शरद पवारांचा राजीनामा…”, अजितदादांच्या ‘त्या’ भूमिकेवरून अंजली दमानियांचा टोला
दरम्यान, एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारलं की, शरद पवारांच्या गोष्टी दोन दिवसांनी समजतात, या निवृत्तीच्या घोषणेकडे तुम्ही संशयाने पाहताय का? यावर फडणवीस म्हणाले, मला वाटतं यावर आत्ता प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल. आपण थोडी वाट पाहायला हवी.